PAMEX 2023

मार्च २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या व आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे मुद्रण व संलग्न व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायिकांना नवनविन तंत्रज्ञानाची व यंत्रांची माहिती देणारे प्रदर्शन मुंबईच्या गोरेगांव येथे आयोजित करण्यात आले होते.

कोविड २०१९ नंतर बंधनमुक्त वातावरणात पश्चिम भारतात साकारणारी ऑफसेट प्रिंटिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे पहिले प्रदर्शन.आणि ह्याच कारणामुळे ह्या प्रदर्शनात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी
हे प्रदर्शन अत्यंत उत्सूकतेचा विषय होता.

पामेक्स यशस्वी करण्यासाठी पामेक्स आयोजकांकडून ७ शहरात पामेक्स रोड शो आयोजित करण्यात आले होते.
पामेक्स २३ चे अध्यक्ष श्री रवींद्र दि. जोशी व त्यांच्या टीम ने डिसेंबर २०२२ ते ५ मार्च २०२३ अशा ३ महिन्यांच्या कालावधीत भारतातील ७ प्रमुख शहरात पामेक्स रोड शो आयोजित केले. ह्यापैकी पहिला रोड शो शुक्रवार दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यातील कर्वेरोड वरील हॉटेल प्रेसिडेंट येथे आयोजित करण्यात आला. ह्या कार्येकमा अंतर्गत प्रिंटिंग क्षेत्राच्या विविध शाखेतील ५ अग्रेसर कंपनीच्या प्रतिनिधींकडून उपस्थित मुद्रकांसोबत मुद्रण व्यवसायांसंबंधी विषयांवर परिसंवादात्मक चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. ह्या नंतर सर्व उपस्थित अभ्यंगतांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. ह्या कार्येक्रमाला अंदाजे २५० ते ३०० मुद्रक व्यवसायिक उपस्थित होते. ह्या कार्येक्रमाला पुण्याशिवाय कोल्हापूर, सोलापूर , सांगली, इचलकरंजी,अ. नगर, ठाणे, डोंबिवली ह्या शहरातील मुद्रकांनी हजेरी लावली होती. हा रोड शो खूप उत्साहपूर्ण वातावरणात व शिस्तबद्ध पध्दतीने पार पडला.

जसे जसे दिवस पुढे जात होते व पामेक्स २०२३ प्रदर्शनाची तारीख जवळ येत होती तशी शहरातील मुद्रकांची त्या बाबतीची उत्सुकता वाढत चालली होती. आपल्या (PPOA) संस्थेला स्टॉल मिळणार असल्याचे कळवण्यात आले, त्या नंतर हा उत्साह व द्विगुणीत झाला, तात्काळ संस्थेच्या संचालक मंडळाने “पामेक्स समिती” ची नेमणूक करून पामेक्स मधील स्टॉल च्या उभारणी व सुशोभीकरणाची सर्व अधिकार व जबाबदारी त्या समितीकडे देण्यात आली.

संस्थेचे एक विद्यमान संचालक श्री राजेंद्र सुपे व त्यांचे व्यवसाय भागीदार श्री विनायक कालेकार व श्री गिरीश मांडके त्यांच्या पेंटगॉन डिजिटल ह्या कंपनीला PPOA च स्टॉल उभारणी व सुशोभीकरणाचे संपूर्ण काम देण्यात आले. श्री सुपे व त्यांच्या सहकार्यांनी अत्यंत कमी अवधीत एका अप्रतिम अशा स्टॉलची प्रथमतः प्रतिकृती आणि नंतर प्रदर्शनाच्या जागेत प्रत्यक्षात उभारणी केली. स्टॉलच्या आतील भित्तीवर संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती देणारी भित्तिचित्रे ( पोस्टर्स ) लावण्यात आली होती. संस्थेच्या भांडार शाखेमार्फत विक्री करत असलेल्या विविध उत्पादनाची माहिती देणारे एक भित्तिचित्र, P.P.O.A. च्या संचालकांनी AIFMP ह्या शिखर संस्थेमध्ये गेली अनेक वर्षे प्रतिष्ठीत व जबाबदारची पदे भूषवली त्याबाबतची माहिती देणारे भित्तिचित्रं, तसेच आगामी काळात संस्थेकडून साकारणाऱ्या काही नविन प्रकल्पाबाबत माहिती देणारे भित्तिचित्रं व संस्थेकडून सभासदांसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध क्रीडा-उपक्रमांबाबत चे भित्तिचित्रं अशी विविध भित्तिचित्र लावून स्टॉल सुशोभित करण्यात आला होता. ह्या शिवाय संस्थेच्या भांडार शाखेमार्फत विक्री करत असलेली काही उतपादने प्रदर्शित करण्यात आली होती. स्टॉलच्या दोन बाजूंना एल ई डी दिव्यांच्या रोषणाईत साकारलेले संस्थेचे इंग्रजी अक्षरातील नावाने स्टॉल ची शोभा द्विगुणित झाली होती आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

सोमवार दि. २७ मार्च २०२३ वेळ -सकाळी ठीक १० ची स्थळ एन ई सी , गोरेगाव पूर्व, मुंबई. आणि पामेक्स ‘२३ प्रदर्शनाचे मोठया दिमाखदार सोहोळ्यात उदघाटन् झाले. समयी दीप प्रज्वलन करण्यात आले. ह्या उदघाटन् सोहोळ्याच्या प्रमुखपदी P.P.O.A. संस्थेचे लोकप्रिय अध्यक्ष व ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टरप्रिंटर्स’ ( AIFMP ) दिल्ली, ह्या शिखर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व पामेक्स २०२३ चे अध्यक्ष श्री. रवींद्र दि. जोशी हे होते. ह्या शिवाय ” वर्ल्ड प्रिंट अँड कॉम्युनिकेशन फोरम ” [ W.P.& C.F. ] चे अध्यक्ष श्री. कमल चोप्रा व ” फोरम ऑफ आशिया पॅसिफिक ग्राफिक आर्ट ” [ F.A.P.G.A.] चे अध्यक्ष श्री. मनोज मेहता ह्या मान्यवरांच्या हस्ते दीप-प्रज्वलन करण्यात आले.

४ दिवसांच्या कालावधीत भारतभरातून अनेक मुद्रक बांधवांनी प्रदर्शनाला भेट दिली.४ दिवसांच्या कालावधीत भारतभरातून अनेक मुद्रक बांधवांनी ह्या प्रदर्शनाला भेट दिली. ह्या प्रदर्शनाला पुण्यातील मुद्रक बांधवांना भेट देण्यात यावी ह्यासाठी संस्थेकडून अत्यंत नाममात्र दरात वातानुकुलित बसची करण्यात आली होती. पुण्यातील ३०-३५ स्त्री-पुरुष मुद्रकांनी ह्या सोयीचा फायदा घेतला. ह्या सर्व मुद्रकांनी प्रदर्शनाला व पर्यायाने संस्थेच्या स्टॉलला भेट दिली. संस्थेच्या स्टॉल ला भेट देणाऱ्या पुणे शहरातील व शहराबाहेरील मुद्रक बांधवांनी संस्थेच्या ‘मुद्रण साहित्य भांडार’ ह्या संकल्पनेचे कौतुक केले. ह्या शिवाय संस्थेच्या स्टॉलच्या फलकावर प्रदर्शित केलेली “मुद्रकांची-प्रतिज्ञा” ही सर्व उपस्थित मुद्रकांच्या चर्चेचा विषय होता.

एकंदरीतच “पामेक्स २०२३” प्रदर्शन सोहोळ्याला मोठया प्रमाणात मुद्रकांनी हजेरी लावली. ४ दिवसांच्या कालावधीत ३५ – ४० हजार अभ्यंगतांनी प्रदर्शनाला भेट दिल्याची नोंद झाली. आणि असे असताना सुद्धा हे प्रदर्शन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शिस्तबद्ध व निर्विघ्नपणे पार पडले. पामेक्स समीतीने देशाच्या विविध भागात आयोजित रोड शो केल्याने हे फळ असल्याचे दिसून आले. हे प्रदर्शन सर्वांसाठीच म्हणजे, विक्रेत्यांना व खरीददारांना उपयोगी व फायद्यांचे ठरल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

~ गुणेश मा. आवटे , व्यवस्थापक